नाशिक : राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाच्या उपनेता पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचा निरोप त्यांना आलेला नाही, दरम्यान घोलप संस्थापक अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्यावतीने उद्या म्हणजे रविवारी मुंबईतील दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ जमून शक्ती प्रदर्शन करणार आहेत. तर घोलप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मग दादर येथे जाणार आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबनराव घोलप हे उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यानुसार त्यांना उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात शिवसेना सोडून गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला तसेच घोलप यांच्याकडील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद अचानक काढून घेऊन त्या ठिकाणी सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे घोलप नाराज असून त्यांनी आपल्याकडील उपनेते पदाचाही राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता.
या संदर्भात घोलप यांचे म्हणणे ऐकून घेऊन दोन दिवसात निर्णय घेऊ असे त्यांना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र आठवडा झाला तरी त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, बबनराव यांनी या संदर्भात सांगितले की पक्षाकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे. माझ्या उमेदवारीला कायदेशीर अडचणी असतील तर त्याऐवजी माझा मुलगा माजी आमदार योगेश घोलप हा लोकसभा मतदारसंघातून लढू शकतो, असे ते म्हणाले.