सिन्नर (नाशिक) : सलग तीन वेळा आमदार झालेले व माजी राज्यमंत्री, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम सखाराम दिघोळे(77) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. नाशिक येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सुमारे तीन महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी अशालता, मुलगा अभिजित, मुलगी अंजली राठोड असा परिवार आहे.
सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र असलेल्या दिघोळे यांनी 1985 ते 1999 या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. युती शासनाच्या काळात त्यांनी साडेतीन वर्षे ऊर्जा आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या दिघोळे यांचे सिन्नरच्या विकासात मोठे योगदान आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर शहरासाठी पाणीयोजना राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा उचलला. कडवा धरणाचे पाणी पूर्व भागात आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.