सिडको : दत्त चौक येथील एका मंगल कार्यालयात माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत मोफत शिलाई वाटपाचा कार्यक्रमा निमित्ताने महापालिकेच्यावतीने खासगी मंगल कार्यालयातील स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यासाठी आरोग्य विभाग धावाधाव करत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे संपूर्ण सिडको विभागात महापालिकेच्या दहा ते पंधराहून अधिक मुतारी व शौचालय असून, त्याची नियमित स्वच्छता होत नसताना खासगी ठिकाणच्या स्वच्छतागृहाची तत्परता दाखविण्याच्या महापालिकेच्या या अजब प्रकाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिडकोतील दत्त चौक भागात असलेल्या एक मंगल कार्यालयात रविवारी (दि. १९) भाजपाचे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना शिलाई वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने परिसरातील रस्ते साफसफाई तसेच रस्त्याची डागडुजी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, ज्या खासगी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे तेथील स्वच्छतागृहाचीदेखील महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून साफसफाई केली जात आहे. सदरचा कार्यक्रम दोन दिवसांनी असतानाही महापालिकेचा सिडको बांधकाम व आरोग्य विभाग मोठ्या जोमाने कामाला लागला असून, दुसरीकडे मात्र सिडकोतील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याचे मनपा अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सिडकोत महापालिकेच्या दहा ते पंधरा ठिकाणी स्वच्छतागृह असताना त्याची नियमित स्वछता होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र खासगी स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यासाठी धावाधाव करत आहे.
कोट==
महापालिकेचा सिडको आरोग्य विभाग हा संपूर्ण सुस्तावलेला आहे. कोणत्याही प्रकारचे काम या विभागाकडून केली जात नाही. ना साफसफाई ना धूर फवारणी तसेच औषध फवारणी या विभागाकडून केली जात नसून अशा कामचुकार अधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी.
- बाळासाहेब गीते, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
(फोटो १७ सिडको)