गेल्या काही दिवसांपासून महागठबंधन, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्ताधारी काँग्रेस व महापालिकेच्या कामकाजाबाबत टीका केली जात होती. त्याला उत्तर देताना माजी आमदार शेख म्हणाले की, उड्डाण पूल, दूषित पाणी, धोकेदायक इमारतींबाबत विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या कामांच्या नियोजनाबाबत महापालिकेत सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे. शहरातील खासगी व सरकारी धोकेदायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. आयेशानगर भागातील स्वीपर कॉलनीची इमारत धोकेदायक आहे. या इमारत परिसरात १२८ परिवार वास्तव्य करीत आहेत. संबंधितांना स्थलांतराबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सायने व म्हाळदे शिवारातील घरकूल योजनेत स्थलांतरित केले जाणार आहे. स्वीपर कॉलनी पाडून त्या ठिकाणी नव्याने पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत घरे उभारले जातील. उड्डाण पुलाची गरज नसल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. मात्र जुना आग्रा रोडवरुन हजारो विद्यार्थी ये - जा करीत असतात. उड्डाण पुलामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित जाता येणार आहे. उड्डाण पुलाला विद्यमान आमदारांनी २० कोटी रूपये निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे; मात्र एका व्यक्तीच्या मालमत्तेसाठी उड्डाण पुलाच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. येत्या ३० जूनपर्यंत उड्डाण पुलाचे रखडलेले काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा निर्धार शेख यांनी व्यक्त केला.
इन्फो
औषधांच्या मात्रेमुळे पाणी खराब
शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत आहे. दूषित पाणीपुरवठा केला जात असलेला विरोधकांचा आरोप राजकीय भांडवल करण्यासाठी होता. पाणीपुरवठा केंद्राद्वारे औषधांची मात्रा कमी अधिक झाल्यामुळे पाणी खराब आल्याचे चौकशीत समोर आले आहे; मात्र विरोधक प्रत्येक गोष्टीवर राजकारण करीत असल्याची टीका शेख यांनी केली.
इन्फो
प्रदेशाध्यक्ष शनिवारी मालेगाव दौऱ्यावर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (दि. २६) शहर काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पटोले येणार आहेत. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांची बैठक होणार असल्याची माहिती माजी आमदार रशीद शेख यांनी दिली.