तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. विहिरींची पाणीपातळी खालावली असून, साठवण बंधारे कोरडे आहेत. जोरदार पाऊस न झाल्याने तालुक्यात कोठेही ओहोळ, नाले, नद्या भरून वाहिल्या नाहीत. किमान लाभक्षेत्रातील गावांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करता येईल यासाठी बिगर सिंचनाचे आवर्तन सोडणे गरजेचे असल्याचे माजी आमदार वाजे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच कालव्याला पाणी सोडून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण दूर करता येऊ शकणार असल्याचेही पुढे म्हटले आहे.
चौकट-
पाणी योजनांचे तलाव भरून द्यावेत
बिगर सिंचनाद्वारे लाभार्थी गावांतील पाणी योजनांचे तलाव भरून द्यावेत, त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांतील माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. तरी कडवा कालव्याद्वारे बिगर सिंचनाच्या आवर्तनातून योजनांच्या पाणी तलावांत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार वाजे यांनी केली आहे.
चौकट-
लाभक्षेत्रातील गावे पाणीटंचाईने हैराण
पंचाळे, मिठसागरे प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग १ व २ अंतर्गत येणाऱ्या वडांगळी, कीर्तांगळी, एकलहरे, खडांगळी, निमगाव - देवपूर, चोंढी, मेंढी, सोमठाणे, सांगवी, पंचाळे, शिंदेवाडी, उजनी, दहिवडी या गावांत पुरेशा प्रमाणात माणसांसह जनावरांच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असल्याचे राजाभाऊ वाजे यांनी निवेदनात नमूद केले आहे.