नाशिक- नाशिक बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना अनोळखी व्यक्तीने मोबाईल वर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पिंगळे यांनी पोलिसात तक्रार दिली असून, या धमकीमुळे बाजार समितीचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.गेल्या साडेतीन वर्षांपासून पिंगळे हे बाजार समितीच्या राजकारणापासून दूर होते, मात्र या काळात त्यांचे व माजी सभापती चुंबळे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. न्यायालयात हा वाद गेला तर एकमेकाच्या गटावर कुरघोडीचे प्रकारही घडले होते. दोन आठवड्यापूर्वी पिंगळे पुन्हा सभापती झाले. त्यानंतर त्यांनी कामाला गती दिली. बाजार समितीच्या त्रिंबक येथे असलेल्या जागेवर मार्केट उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने मंगळवारी (दि१५) रोजी पिंगळे व बाजार समितीचे संचालक थेटे त्रिंबक येथे जागा पाहणीसाठी गेले होते. शुक्रवारी (दि.१८) रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी परिस्थिती असताना पिंगळे रात्री आपल्या शेतावरून परतत असताना त्यांना गिरणारे- वडगाव रस्त्यावर अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. पिंगळे यांनी फोन कट केला असता, त्या व्यक्तीने पुन्हा पुन्हा फोन केला. या प्रकाराबद्दल पिंगळे यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरून शोध घेतला जात आहे.