नाशिक: शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मुत्रपिंड विकाराने आज सायंकाळी पंचवटीतील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून ते पंचवटीतील एका खासगी रूग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अनेक शिवसैनिक भेटी देखील घेत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या रूग्णालयात धाव घेतली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लामरोडवरील देवळाली हॉस्पीटल येथे ठेवण्यात आले आहे. शनिवारी (दि.१८) साडे नऊ वाजता संसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गोडसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परीवार आहे.
मध्यंतरी काही काळासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत गेलेले राजाभाऊ गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने पुन्हा स्वगृही परतले. शिवसेनाचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहेरा ही त्यांची ओळख होती. नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन १९९३ मध्ये झाले आणि ते सत्तेकडे नेणारे ठरले. त्यानंतरच १९९४-९५ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत नाशिकमधून गोडसे निवडून आले होते. संसरी सारख्या छोट्या गावातून त्यांची राजकिय कारकिर्द सुरू झाल्याने त्यांचा तळागाळातल्या जनतेशी संबंध होता.
खासदार असताना त्यांनी लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या मांडल्या. अवघ्या अडीच वर्षांची कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीवर पुस्तकही लिहीले. खासदार असताना त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवर काम देखील केले होते. शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता.
शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवळाली कॅम्प सेनेपासून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संसरी ग्रामपंचायतीचे संरपंच म्हणून सत्तेच्या पदांना सुरूवात झाली तरी संघटनेवर त्यांची पकड असल्याने तब्बला १२ शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची कारकिर्द त्यांनी गाजली. एकलहरा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.