नाशिक : माजी खासदार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या नाशिक येथील घराजवळून कामधेनु बंगला डिसूजा कॉलनी, जेहान सर्कल सर्कल जवळ, गंगापूर रोड येथून दुपारी तीन वाजता निघेल. वर्षभरापूर्वी त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्देबद्दल त्यांचा जीवन गौरवाने सन्मान करण्यात आला होता. ते धुळे लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
"प्रताप दादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी"
माजी खासदार व मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी सभापती प्रताप दादांच्या निधनाची बातमी ऐकली, सकाळी सकाळी ही बातमी मन सुन्न करणारी ठरली दादांची कारकीर्द मी फार जवळून पाहिली. दादांनी कधीही सत्ता किंवा कसला मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनतेच्या विकासासाठी लढा दिला. दादा आपल्यातून आज निघून गेले यावर विश्वास बसत नाही. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली दादानां भावपूर्ण श्रद्धांजली ...! त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद मिळो हीच ईश्वचरणी पार्थना...
- दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक