नाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:50 PM2020-01-22T18:50:39+5:302020-01-22T18:53:43+5:30
पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांचे बंधू बाबुलाल बोरा यांच्या पेठरोडवरील दत्तनगरमधील निवासस्थानापासून गुरूवारी सकाळी १० वाजता अमरधामच्या दिशेने निघेल.
नाशिक : जिल्हा महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपद सुमारे २१ वर्षे भुषविणाऱ्या तसेच ममहिला विकास व एस.टी महामंडळाच्या संचालक राहिलेल्या शांताबाई बाबुलाल छाजेड (९२) यांची प्राणज्योत बुधवारी (दि.२२) संथारा व्रतामध्ये संध्याकाळी मालवली. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांचे बंधू बाबुलाल बोरा यांच्या पेठरोडवरील दत्तनगरमधील निवासस्थानापासून गुरूवारी सकाळी १० वाजता अमरधामच्या दिशेने निघेल.
शांताबाई छाजेड यांना ‘बाईजी’ नावाने ओळखले जात होते. त्यांचा जन्म २८ मे १९२८ साली दिंडोरी तालुक्यातील ‘रामशेज’च्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी गावात झाला होता. त्यांच्या जन्मापुर्वीच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यांनी अनेक वर्षे जैन धर्मशाळेत शिक्षक म्हणून भावी पिढी घडविण्याचे कार्य केले. त्यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक किसनलालजी बोरा यांच्या प्रेरणेतून छाजेड या कॉँग्रेसमध्ये सक्रीय झाल्या. १९४६ साली नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय कॉँग्रेस अधिवेशनात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारख्या अनेक मोठ्या राष्टÑीय नेत्यांच्या भोजनसमितीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. १९४२मध्ये झालेल्या रॉकेलच्या आंदोलनात छाजेड यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी प.पू. गणेशालालजी म.सा. यांच्या प्रेरणेने अजन्मभर खादीचा अंगिकार केला होता. त्यांनी बुधवारी दुपारी संध्याकाळी गौतममुनीजी म.सा., स्नेहप्रभाजी महासतीजी यांच्याकडून ‘संथारा’ व्रत स्विकारले होते. दरम्यान, त्यांचे संध्याकाळी निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. त्यांचे अंंत्यदर्शन घेण्यासाठी शहरातील कॉँग्रेसच्या विविध नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती.