नाशिक : दि पीपल्स बॅँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ रमेश महादेव केंगे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले. केंगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांनतर गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळीच अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी खासदार प्रतापराव वाघ, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह सहकार आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश केंगे हे लासलगावचे मूळ रहिवासी होते. सुरुवातीला शासनाच्या सहकार खात्यात कार्यरत होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी नाशिकमध्ये प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मुळात सामाजिक कार्याची आवड असल्याने विविध संस्थांशी जोडले गेले. नाशिकमधील सर्वांत जुनी असलेली नाशिक पीपल्स को-आॅपरेटीव्ह बॅँक १९८० मध्ये अडचणीत आली होती. त्यावेळी शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळात ते उपाध्यक्ष होते. त्यानंतर झालेल्या पिपल्स बॅँकेच्या निवडणुकीत भास्करराव बोरस्ते-रमेश केंगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले. त्यानंतर केंगे सलग चार वेळा निवडून आले. बॅँकेचे संचालक, मानद संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. शिर्डी येथील श्री साई संस्थान, तसेच नाशिकमधील विविध संस्थांवर त्यांनी विश्वस्त म्हणून काम बघितले. यात श्री काळाराम मंदिर ट्रस्टवर असताना त्यांनी मंदिराच्या परिसरातील संवर्धन आणि नूतनीकरणाला गती दिली. गणेशबाबा ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णा ट्रस्ट अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले. सहकार क्षेत्राबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. नाशिक वसंत व्याख्यानमालेत त्यांनी काम केले. सध्या ते चतु:शाखीय ब्राह्मण संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)
पीपल्स बॅँकेचे माजी अध्यक्ष रमेश केंगे यांचे निधन
By admin | Published: September 09, 2016 1:29 AM