पेठ : तालुक्यातील झरी-सावर्णा परिसरातील जंगलात एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून तो तीन-चार दिवसांपूर्वीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सावर्णा येथील भागवत काकड हे सकाळी सावर्णा शिवारात झरी वनपरिक्षेत्रात जळाऊ लाकूडफाटा आणण्यासाठी जात असताना त्यांना झाडाझुडपात एक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घाबरलेल्या काकड यांनी तत्काळ गाव गाठत पोलीसपाटील देवराम बोसारे यांना माहिती दिली. याबाबत पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चौकशी केली असता सदरचा मृतदेह बोरधा येथील रहिवासी व सध्या घुबडसाका येथे घरजावई म्हणून वास्तव्यास असलेल्या दशरथ भास्कर दिवे (२१) यांचा असल्याचे समजले. साधारण तीन-चार दिवसांपूर्वी जंगली श्वापदांच्या हल्ल्यात सदर युवकाचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. याबाबत पेठ पोलिसांत नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.भुवन घटनेची पुनरावृत्तीकाही वर्षांपूर्वी तालुक्यातील भुवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओट्यावर झोपलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करत झोपेतच त्याच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना घडली होती. सावर्णा वनपरिक्षेत्रात घडलेल्या या घटनेने भुवन येथील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावर्णा जंगलात आढळला युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM