नाशिक : महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, मराठी आणि इंग्रजी वाङ्मयावर प्रभुत्व असलेले वक्ते आणि प्रवचनकार आचार्यप्रवर महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनाने पंथाचा आधारवड कोसळला, अशी भावना श्रीक्षेत्र सुकेणे येथे गुरुवारी (दि. ६) आयोजित श्रद्धांजलीपर सभेत संत-महंतांनी आणि मान्यवरांनी व्यक्त केली. आचार्यप्रवर महंत सुकेणेकर यांनी वयाची शंभरी पार करून १०५ व्या वर्षी दि. २९ मार्च रोजी इहलोकीची यात्रा संपविली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुकेणे येथील मविप्र संस्थेच्या शाळेच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य महंत कारंजेकरबाबा (अमरावती) म्हणाले की, त्यांनी केलेल्या धर्मकार्याचा वसा सर्वांनी अंगीकारावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी महंत नागराजबाबा (औरंगाबाद), महंत साळकरबाबा (धुळे), महंत कापूसतळणीकरबाबा (सातारा), महंत यक्षदेवबाबा शास्त्री (राक्षसभुवन), अनंतराज भोजने (सेलू), तळेगावकरबाबा (चांदोरी), श्यामदादा शेलगावकर, भीष्माचार्यबाबा, ऋषीराजबाबा घुगे, अचलपूरकरबाबा (पळसे), कृष्णराज मराठे, पाचराऊतबाबा, पातूरकरबाबा (शहादा), तपस्विनी सुभद्राबाई कपाटे, संदीपदादा कपाटे, हेमंतबापू बीडकर आदि संत, महंतांनी महंत सुकेणेकरबाबा यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आमदार बाळासाहेब सानप व जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांनीही महंत सुकेणेकर बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. सुकेणेकर गादीवर विराजमान झालेले नवनिर्वाचित महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर यांनी महंत बाबांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी सर्व संत, महंतांचे सहकार्य घेऊ, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. याप्रसंगी गोपीराज शास्त्री सुकेणेकर, अर्जुराज सुकेणेकर, प्रा. राजेंद्र निकम, मिलिंद दंडे, प्रभाकर कातकाडे आदि उपस्थित होते. दरम्यान, पहाटे श्रीदत्त मंदिरात मूर्तीला मंगलस्नान, गीता पठण, पारायण आदिंसह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. (प्रतिनिधी)
महानुभाव पंथाचा आधारवड कोसळला
By admin | Published: April 07, 2017 1:19 AM