नाशिक : जिल्ह्यातील सुमारे एक हजार प्राथमिक शाळा व साडेतीन हजार अंगणवाड्यांना स्वत:च्या पाणीपुरवठ्याची सोय नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, येत्या शंभर दिवसांत या सर्व शाळा, अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यात ३४००हून अधिक प्राथमिक शाळा असून, यातील काही शाळांसाठी गावातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आलेली असली तरी, यातील सुमारे ९८९ शाळांमध्ये अद्यापही पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय नाही. अशीच परिस्थिती अंगणवाड्यांची आहे. जिल्ह्यात ५२८५ अंगणवाड्या असून, या अंगणवाड्यांना स्वत:ची पाणीपुरवठ्याची यंत्रणा नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकरवी गावातील सार्वजनिक नळावरून अथवा बोअर किंवा विहीरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. फक्त ३५ टक्के म्हणजेच १७२९ अंगणवाड्यांनाच सध्या नळ कनेक्शन कार्यरत आहे. वर्षानुवर्षे या शाळा, अंगणवाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शिवाय शाळांमधील स्वच्छतागृहेदेखील पाण्याअभावी ओस पडत होती. आता मात्र केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन म्हणजेच ‘हर घर नल’ या योजनेंतर्गत सर्व शाळा, अंगणवाड्यांना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावोगावच्या ग्रामपंचायतींना चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगापोटी मिळालेल्या निधीतून नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. पाणीपुरवठा व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जल जीवन मिशन योजनेंतर्गत येत्या शंभर दिवसांत ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्याची सुरुवात २ ऑक्टोबरपासून झालेली आहे. ९ जानेवारी २०२१ पर्यंत ही योजना पूर्ण करण्यात येईल. शुक्रवारी यासंदर्भात सर्व गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण व महिला-बाल कल्याण विभागाची ऑनलाइन बैठक होऊन त्यात कृती कार्यक्रम ठरविण्यात आला.
साडेचार हजार शाळा, अंगणवाड्या पाण्याविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 1:06 AM
जिल्ह्यातील सुमारे एक हजार प्राथमिक शाळा व साडेतीन हजार अंगणवाड्यांना स्वत:च्या पाणीपुरवठ्याची सोय नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, येत्या शंभर दिवसांत या सर्व शाळा, अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
ठळक मुद्देजलजीवन मिशन : शंभर दिवसांत देणार नळ कनेक्शन