नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी पश्चिम विभागातून बुधवारी (दि.१) एकूण सात नामनिर्देशनपत्र दाखल झाले असून, यातील तीन इच्छुकांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पश्चिम विभागात आतापर्यंत एकूण विविध प्रभागांतून ७ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. पश्चिम विभागातील निवडणूक कार्यालयात बुधवारी दिवसभर विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची वर्दळ दिसून आली. यातील विद्यमान नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी प्रभाग १२ ड मधून व १२ ब मधून सर्वसाधारण खुला व नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही जागांवरून पक्षाच्या चिन्हाची मागणी केली आहे. तर माजी नगरसेवक हेमलता पाटील यांनी प्रभाग १२ क मधून सर्वसाधारण महिला या राखीव जागेसाठी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यातील एका अर्जात त्यांनी पक्ष चिन्हाची मागणी केली असून, दुसरा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून सादर केला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून बुधवारी एकच अर्ज आला. राजश्री नामपूरकर यांनी प्रभाग ७ ब या सर्वसाधारण महिला या राखीव जागेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर जयश्री घोडके यांनी प्रभाग २४ अ या नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या राखीव जागेसाठी पक्ष चिन्हाची मागणी करीत नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, त्यांनी २४ क सर्वसाधारण महिला या राखीव जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. पश्चिम विभागातून बुधवारी एकूण चार उमेदवारांनी विविध प्रभागांमधून ७ अर्ज दाखल केले असून नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी गुरुवार व शुक्रवार अशा दोनच दिवसांची मुदत उरली असल्याने गुरुवारपासून निवडणूक कार्यालयात इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
चार इच्छुकांनी दाखल केले सात अर्ज
By admin | Published: February 02, 2017 1:23 AM