पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या आईला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत व्यापाऱ्याला शिवीगाळ व बेदम मारहाण करून व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी येवला येथून अटक केली. तसेच संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे.
पेठरोडवरील शनी मंदिर परिसरात राहणारा संदीप पगारे हा भाजीपाला खरेदी-विक्री करणारा व्यापारी गेल्या मंगळवारी घरामागे मित्र सनी सोनवणे सोबत बसलेला असताना रात्री साडे नऊ वाजता संशयित विशाल चंद्रकांत भालेराव, गौरव सोनवणे, शुभम मधुकर खरात आणि सिद्धार्थ संजय बागुल आदींनी चॉकलेटी रंगाच्या इनोव्हा चारचाकीतून (एम. एच. ४४ बी ११३१) येत लाकडी दंडुक्याने पगारेला बेदम मारहाण करून भाजीमार्केटमध्ये धंदा करण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच पगारेच्या घरात घुसून पगारेच्या आई व पत्नीला धारदार कोयत्याचा धाक देत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह सागर कुलकर्णी, दिलीप बोंबले, कुणाल पचलोरे, राजेश राठोड धनशाम महाले, कल्पेश जाधव आदींनी संशयितांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.