याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी व परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच चेन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याने महिलावर्गही भयभीत झाला होता. काही दिवसांपूर्वी लखमापूर परिसरातील एका कंपनीत जबरी लुटीचा प्रकार घडला होता. त्याचा तपास आजपावेतो सुरू आहे. वणीतील एका घरातून गॅस सिलिंडर व सौभाग्य लेण्याची चोरी झाली होती. हे सर्व प्रकार घडत असताना अंबानेर शिवारातून लोखंडी अँगलच्या पट्ट्या, पावडर फवारणीचा स्प्रे, ड्रिपच्या नळ्या, पाण्याच्या मोटरचा लोखंडी एल्बो व जुने वापरते शटर असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद विजय शेजवळ व रवींद्र हिरे यांनी वणी पोलिसांत दिली होती.
इन्फो
पोलिसी खाक्यानंतर कबुली
प्रकरणाचा तपास करत असताना सदरची चोरी चार संशयितांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यास अनुसरून पोलिसांनी राकेश राजेंद्र चौधरी, सचिन दत्तात्रय गायकवाड, भूषण बाळू धुळे, अजय संजय दळवी या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता अंबानेर शिवारात केलेल्या चोरीची कबुली दिली. चोरीचा ऐवज पोलिसांनी या चौकडीकडून जप्त केला. वणी पोलिसांनी वणी व परिसरात आजपर्यंत झालेल्या चोऱ्या या संशयितांनी केल्या किंवा कसे, याचाही शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत व पोलीस उपनिरीक्षक रतन पगार करत आहेत.