नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
By संकेत शुक्ला | Published: June 12, 2024 08:44 PM2024-06-12T20:44:06+5:302024-06-12T20:44:36+5:30
राजेंद्र विखे यांच्यासह काँग्रेसच्या पाटील यांनी घेतली माघार
नाशिक - महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माघारीच्या अंतिम दिवशी नाशिकमध्ये येऊन विनंती केल्यानंतर प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. याच दरम्यान काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांनीही माघार घेतली. मात्र अजीत पवार गटाचे महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीत बंडखोरीचे वारे कायम आहे. असे असले तरी नाशिकमध्ये शिंदेसेनेचे किशोर दराडे, उद्धव सेनेचे ॲड. संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि भावसार यांच्यात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
येत्या २६ जून रोजी शिक्षक विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी नाशिक विभागामधून माघारीच्या अंतिम मुदतीनंतर २१ उमेदवार रिंगणात असून १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर नामसाधर्म्य असलेल्या किशोर दराडे यांच्या कथित अपहरण नाट्यावरून राज्यभरात लक्षवेधी असलेल्या नाशिक विभाग विधनापरिषद निवडणुकीसाठी अंतिम दिवशी नगर येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विनंतीनंतर माघार घेतली. याशिवाय वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनुसार कोकण येथील जागा काँग्रेसला तर नाशिक उद्धवसेनेला सुटल्याने नाशिकमध्ये दिलीप पाटील यांनी माघार घेतली. तर भाजपकडून इच्छुक धनराज वसपुते यांनीही माघार घेतली. मात्र राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाकडून रिंगणात असलेल्या ॲड. महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने युतीतील बंडखोरीचे वारे कायम आहे.