येवला : माहेरहून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे आणावेत या साठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये पतीसह सासू, सासरे आणि दिर अशा चौघांवर येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.भागचंद परसराम लासुरे, परसराम नारायण लासुरे,ताराबाई परसराम लासुरे, कौतिक परसराम लासुरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तेजश्री भागचंद लासुरे या विवाहितेने जिल्हा पोलिस अधीक्षक महिला सुरक्षा समिती, नाशिक यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती. तक्र ारीची पडताळणी होऊन संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी शिफारस महिला सुरक्षा समितीने येवला ग्रामीण पोलिस ठाण्यास केली होती. त्यानुसार येवला ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.२० जून २००७ ते ६ नोव्हेंबर २०१९ या दरम्यानच्या काळात सदर घटना घडली असून , माहेराहून वेळोवेळी रोख रक्कम, मानपानाच्या वस्तू, घर बांधण्यासाठी रक्कम, विविध वस्तूंची मागणी या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे दाखल गुन्ह्यात म्हटले आहे. विवाहितेची आई व वडील दोघे सरकारी नोकरीत असल्याने व त्यांना मोठा पगार असल्याने वेळोवेळी पैशांसाठी उपासमार करून पिडितेला मारहाण करण्यात आली, पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, घटस्फोटीत दिराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने कौतिक परसराम लासुरे यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना अटक करण्यास पोलिसांचे पथक गेले असता, ते आढळून आले नाही. येवला ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक तांदळकर अधिक तपास करत आहेत.
विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 6:25 PM
येवल्यातील घटना : महिला सुरक्षा समितीकडून दखल
ठळक मुद्देसंशयितांना अटक करण्यास पोलिसांचे पथक गेले असता, ते आढळून आले नाही.