लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बेकायदेशीरपणे कारमध्ये पिस्तुलसारखे अग्निशस्त्र बाळगून भटकंती करणाऱ्या चौघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुन्हेगारी कारवायांच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार असलेले चौघे युवक पिस्तूल घेऊन कारमधून फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने जयभवानीरोडवर सापळा रचला. या ठिकाणी आलेल्या एका संशयिताच्या फोर्चूनर कारची (१५ सीएच ९३९२) पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये बसलेले संशयित राहूल संदीप सोनार (२९, रा. स्वप्निल सोसायटी, जयभवानीरोड), सागर किसन कोकणे (२१, रा. हनुमान चौक चेहडी), दर्शन उत्तम दोंदे (२३, राजवाडा, कामटवाडे) आणि प्रशांत नानासाहेब जाधव (२४, रा. देवळाली गाव) यांनी प्रत्येकी एक अशी चार पिस्तुले स्वतःजवळ बाळगल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तुले, काडतुसे जप्त करीत त्यांना बेड्या ठोकल्या. पोलीस कर्मचारी राहूल पालखेडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.