लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरात तीन दिवसात ३८, तर तालुक्यात ६२ रुग्णांची वाढ झाली. सटाणा न्यायालयात तीन, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून (दि. २५) शुक्रवारपर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.सटाणा शहर व परिसरात तीन दिवसांत ३८हून अधिक तर आज जवळपास तब्बल १३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर चार जणांचा बळी गेल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यू घोषित करण्याची मागणी मनसेचे पंकज सोनवणे व मंगेश भामरे यांनी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.या पार्श्वभूमीवर शनिवारी येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात सामाजिक अंतर ठेवून शहरातील व्यापारी, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व पत्रकार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंगळवार ते शुक्रवार चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे घोषित करण्यात आले.
या जनता कर्फ्यूदरम्यान मेडिकल सेवावगळता सर्व व्यवसायांसह अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार असून, रस्त्यांवर पूर्ण शुकशुकाट असावा यासाठी जनतेनेदेखील घराबाहेर पडू नये, असा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.या बैठकीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे, व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र राका, नगरसेवक महेश देवरे, राहुल पाटील, राकेश खैरनार, बाजार समिती व्यापारी रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, शरद ततार, राजकुमार सोनी, अनिल बागुल, मनसेचे पंकज सोनवणे, मंगेश भामरे, अरविंद सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, किशोर कदम, बापू अमृतकर, पत्रकार विश्वास चंद्रात्रे, कैलास येवला, अंबादास देवरे आदींसह शहरातील विविध व्यावसायिक, पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
तीन दिवसात ४२ बाधित
शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सटाणा शहर हॉटस्पॉट बनले असून, शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालात शहरातील १३, तरतालुक्यातील २९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बागलाणची रुग्णसंख्या तीनशेचा टप्पा गाठण्याची शक्यता बळावली आहे.सटाणा शहर दिवसागणिक कोरोना हॉटस्पॉट होऊ लागले असून, दि. १९ रोजी ७, दि . २० रोजी ११ , दि . २१ रोजी ७, दि. २२ रोजी १३ बाधित आढळून आले आहेत. चार दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.शनिवारी प्राप्त अहवालात ३४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सटाणा शहर १३, नामपूर १२, अंतापूर ४, जायखेडा १ तर ताहाराबाद येथील चार जणांचा समावेश आहे.सटाणा शहर न्यायालयातील तीन जणांचा तर सटाणा बाजार समितीमधील दोन कर्मचारी बाधित आढळून आल्याने या ठिकाणी अधिक दक्षता घेतली जात आहे.