नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यापैकी दोघांचा दोन दिवसांपूर्वी, तर दोघा महिलांचा रविवारी (दि़२०) मृत्यू झाला असून, एकीचा खासगी रुग्णालयातील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ उर्वरित दोन महिला व एका पुरुष यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्या नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़सिडकोतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व स्वाइन फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या बेबीताई चैत्राम चौधरी (६५, रा़पवननगर, श्रीरामनगर, सिडको) यांना शनिवारी (दि़१९) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ रविवारी (दि़२०) सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या रहिवासी रजिया अब्दुल लतिफ पिंजारी (४७) यांना शनिवारी (दि़१९) रात्री दोन वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यामध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असल्याने त्यांना स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ रविवारी (दि़२०) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान शुक्रवारी (दि़१८) स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एक महिला व एक पुरुषाचा समावेश आहे़ सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत पाच संशयितांचा मृत्यू झाला आहे़ सिडकोतील एका वृद्धेच्या मृत्यूनंतर शहरात ही साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे़
स्वाइन फ्लूने चौघांचा मृत्यू
By admin | Published: September 20, 2015 11:39 PM