लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या नाशिक पूर्व, सिडको, नाशिकरोड आणि पंचवटी या चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने चारही ठिकाणी सभापतिपदाची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, पश्चिम आणि सातपूर विभागात सरळ सामना होणार असला तरी काट्याची लढत बघायला मिळणार आहे. याठिकाणी मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतिपदांकरिता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. दि. १९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता सातपूर, दुपारी १२.३० वाजता सिडको आणि दुपारी ४ वाजता नाशिकरोड तसेच दि. २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिक पश्चिम, दुपारी १२.३० वाजता पंचवटी आणि दुपारी ४ वाजता नाशिक पूर्व प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. सभापतिपदाकरिता बुधवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, सिडको विभागातून प्रभाग सभापतिपदाकरिता शिवसेनेचे सुदाम डेमसे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. याठिकाणी शिवसेनेचे सर्वाधिक १४ सदस्य निवडून आल्याने पूर्ण बहुमत आहे. तसेच, नाशिक पूर्वमध्ये भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने शाहीन मिर्झा यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. नाशिकरोडमध्येही भाजपाचे सर्वाधिक १२ सदस्य असल्याने याठिकाणी सुमन सातभाई यांचाच अर्ज दाखल झाला. पंचवटी विभागातही बहुमतात असलेल्या भाजपाच्या प्रियंका माने यांचाच अर्ज दाखल झाला. सिडकोत सेनेच्या बहुमतामुळे भाजपाने तर नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि पंचवटीत भाजपाच्या बहुमतामुळे सेनेने उमेदवारच दिला नाही. त्यामुळे सिडको, नाशिकरोड, नाशिक पूर्व आणि पंचवटी या चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवड बिनविरोध झालेली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या निवडीची अधिकृतपणे घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून होईल. सातपूर प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या माधुरी बोलकर तर शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याठिकाणी भाजपाचे सर्वाधिक ९ सदस्य निवडून आले असले तरी सेना-रिपाइंचे संख्याबळही ९ आहे. त्यामुळे मनसेच्या दोन सदस्यांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो, यावर तेथील सभापतिपदाचा फैसला होणार आहे. तीच परिस्थिती पश्चिम विभागात आहेत. सभापतिपदासाठी विभागनिहाय उमेदवारसिडको - सुदाम डेमसे (शिवसेना), पूर्व - शाहीन मिर्झा (भाजपा), पंचवटी - प्रियंका माने (भाजपा), नाशिकरोड - सुमन सातभाई (भाजपा), सातपूर - माधुरी बोलकर (भाजपा), संतोष गायकवाड (शिवसेना), पश्चिम - प्रियंका घाटे (भाजपा), हेमलता पाटील (कॉँग्रेस)
चार प्रभाग सभापती बिनविरोध
By admin | Published: May 18, 2017 12:42 AM