नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील चौपदरीकरणात अडथळा ठरणाऱ्या २३६ वृक्षांची तोड करण्यास अटी-शर्तींवर परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीने दिलेल्या निर्णयासंबंधीची माहिती आता उच्च न्यायालयाला अवगत करून दिली जाणार आहे. नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर फाटा ते मनपा हद्दीपर्यंत सुमारे २ कि. मी. परिसरात अडथळा ठरणारी २३६ झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मनपाच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे मागितली होती. उच्च न्यायालयानेही सदर वृक्षतोडीबाबत मनपाच्या वृक्षप्राधिकरण समितीने निर्णय घ्यावा, असे आदेशित केले होते. महामार्ग प्राधिकरणचा प्रस्ताव मागील बैठकीत ठेवण्यात आला असता आयुक्तांनी त्यासंदर्भात पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्यान अधीक्षकांना दिल्या होत्या. त्यानुसार, उद्यान अधीक्षक महेश तिवारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली होती. त्यात सदर वृक्षांची तोड करणे अपरिहार्य असल्याचे निदर्शनास आले. परंतु, त्यातील जास्तीत जास्त वृक्ष हे पुनर्रोपित करण्यात यावे आणि जे वृक्ष तोडले जातील त्यांच्या बदल्यात एकास दहा याप्रमाणे नवीन वृक्षलागवड करावी, अशी शिफारस करण्यात आली होती. गुरुवारी (दि.२२) महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षप्राधिकरण समितीची बैठक झाली.
चौपदरीकरणातील अडसर दूर
By admin | Published: December 23, 2016 12:59 AM