नाशिक : जिल्हा परिषदेच्या नांदगाव, येवला, निफाड व चांदवड तालुक्यातील अवघ्या तेवीस जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेने शनिवारी (दि.२८) घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत तब्बल चारशेच्या आसपास उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकांसह जिल्हा परिषदही स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्याने शिवसेनेतील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसाठी तातडीने बैठका व मेळावे घेऊन इच्छुकांची मनोगते जाणून घेतली. शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट वाटपात सेना पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी नांदगाव तालुक्यातील चार गटांसह येवला तालुक्यातील पाच, निफाड तालुक्यातील दहा व चांदवड तालुक्यातील चार अशा तेवीस गटांसाठी इच्छुकांच्या मुलाखती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, आमदार अनिल कदम, संभाजीे पवार, कारभारी अहेर, उत्तम गडाख, जयदत्त होळकर, नितीन अहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव शिवसेना कार्यालयात घेण्यात आल्या. त्यानंतर येवला येथील आसरा लॉन्समध्ये शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती व मेळावा घेण्यात आला. दुपारपर्यंत नांदगाव व येवला आटोपल्यानंतर निफाड तालुक्यातील यशोधन लॉन्स व त्यानंतर चांदवड तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती व मेळावा मातोश्री लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. चारही तालुक्यातील तेवीस गटांसाठी तब्बल चारशेहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी नाशिक तालुक्यासह अन्य काही तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
तेवीस जागांसाठी चारशे इच्छुक
By admin | Published: January 29, 2017 1:03 AM