मेहर चौक सिग्नलवर वाहतूक कोंडी
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात असल्याने नाशिक तालुक्यातील अनेक ठिकाणांहून लोक तहसील कार्यालयात आले होते. यामुळे मेहेर सिग्नल चौकात कोंडी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर दुचाकीस्वार तरुणांची गर्दी मोठी असल्याचे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला होता. त्याममुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
पंडित कॉलनीत टवाळांचा उपद्रव
नाशिक : पंडित कॉलनीतील ठिकठिकाणी उभ्या राहाणाऱ्या टवाळखोरांचा स्थानिक नागरिक तसेच ग्राहकांना उपद्रव होत आहे. या मार्गावर अनेक क्लासेस, नाश्ता स्टॉल्स, रेस्टॉरंट, स्नॅक्स पॉइंट आहेत. या मार्गावर दररोज टवाळखोर मुले गोंधळ निर्माण करीत असल्याची तक्रार आहे. किरकोळ वाद झाली तरी गर्दी जमवून परिरसरात दहशत पसरविली जात आहे.
पंचवटी बाजारपेठेत बस्त्याची गर्दी
नाशिक : पंचवटीतील कापड दुकानांमध्ये बस्त्यासाठी गर्दी झाल्याने बाजारपेठ बहरली आहे. लग्नसराईचा काळ असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. पंचवटीत सध्या बस्ता तसेच बाजार करण्यासाठीची लगबग होताना दिसत आहे. पंचवटीत होलसेल साड्यांचे डेपो असल्याने या दुकानांमधून बस्ता करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
निमाणीसमोरील कोंडी कायम
नाशिक : निमाणीतील बसस्थानक परिसरात असलेली दुकाने, रस्त्यावरच असलेला बसथांबा तसेच, रिक्षा थांबा तसेच रस्त्यातच वाहने उभी केली जात असल्याने स्थानकामध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या बसला अडथळा होत आहे. या चौकात सातत्याने वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चौकातील अनधिकृत विक्रेत तसेच रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.