नाशिक : येथील गंगापुररोडवरील शारदानगर भागात एका भुखंडावर सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आठ दिवसांपुर्वी बांधलेली भिंत सोमवारी (दि.८) सकाळी कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चौघे मजूर दबले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७,दोघे रा. दरी गाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत.
गंगापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शारदानगर भागात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा तानाजी आहेर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू होते. तळमजल्याच्या उभारणीसाठी खोल खड्डा खोदण्यात आलेला होता. याठिकाणी भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते. सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंत बांधत असताना साधारणत: चार ते पाच दिवसांपूर्वी बांधलेली एका बाजूची सुमारे दहा ते पंधर फूट उंचीची भिंत अचानकपणे खड्ड्यात कोसळली. यामुळे त्याठिकाणी असलेले चौघे मजूर त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
घटनेची माहिती समजताच आजूबाजूला असलेल्या मजूरांनी व लोकांनी धाव घेत दाबले गेलेल्या मजुरांना तातडीने बाहेर काढून जवळच्या आनंदवली येथील श्री गुरूजी धर्मदाय रूग्णालयात उपचारासाठी हलविले. याठिकाणी गोकुळ व प्रभाकर यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तसेच अनिल रामदास जाधव (३०,रा.दरी) व संतोष तुकाराम दरोगे (४५,रा.काळेनगर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात नोंद करत तपास सुरू केला असून मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.