नाशिक : केंद्र शासनाने पोलिओ निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात एकूण चार लाख ७१ हजार ४११ बालकांना रविवारी (दि. २७) रोजी पोलिओ लस देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत एकही बालक वंचित राहू नये यासाठी पोलिओ लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण तीन हजार ९०२ पोलिओ बूथ असणार असून, १७३ मोबाइल टीम शहरी व ग्रामीण भागात काम करणार आहेत. तसेच बसस्थानके, रेल्वे स्टेशन, विमानतळ, टोल नाके, जेथे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रान्झिस्ट टीमचे आयोजन करण्यात आले असून, एकूण ७४० ट्रान्झिस्ट टीम काम करणार आहे़. जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय वैद्यकीय अधिकारी यांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या मोहिमेमध्ये पालकांनी आपल्या घरातील व आपल्या परिसरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांना जवळच्या लसीकरण बूथवर पोलिओची लस देऊन आपल्या जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
--इन्फो
बायो व्हायलेंट लसीचा वापर
पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत बायो व्हायलेंट लसीचा वापर करण्यात येणार असून, ग्रामीण व शहरी भागासाठी लसीकरण बूथवर पोलिओचे डोस दिले जाणार आहे. मोहिमेच्या दिवशी बूथवर व त्यानंतर राहिलेल्या लाभार्थींसाठी ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना लस दिली जाणार असून, ज्या ठिकाणी तुरळक लाभार्थी आहेत त्या ठिकाणी मोबाइल टीमच्या माध्यमातून काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.