नाशिक : जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम व्यापक करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत सुमारे चार लाख जनावरांना लसीकरण करावे लागणार असून, लसीच्या उपलब्धतेवर लसीकरणाची मोहीम अवलंबून असणार आहे.
मागील वर्षी जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याने ११५ जनावरांचा यामुळे मृत्यू झाला होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये पशुधनाचा अशाप्रकारचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे पशुधनाचे नुकसान फारसे झाले नाही. आतापर्यंत ४ लाख ४७ हजार जनावरांचे लसीकरण झाले असून, अजूनही ४ लाखांपेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
दिंडोरी आणि मालेगाव तालुक्यांतील जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून आले असून, दोन जनावरांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्येदेखील लम्पी आजाराची जनावरे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने त्यासाठीच मोहीम तीव्र करण्यात आली आहे.