-----------------------------------------------------------------------
चांदवडला दोन दिवसात पंधरा नवीन रुग्ण
चांदवड : येथे दिनांक २९ मे रोजी घेतलेल्या १०५ पैकी १० अहवाल, तर दि. ३१ मे रोजी पाच अहवाल असे एकूण पंधरा पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागात आहेत. तालुक्यातील चांदवड, बहादुरी, भरवीर, कोकणखेडे, भोयेगाव, धोंडबा, खडकजांब, नारायणगाव, उसवाड, वडाळीभोई, वडनेरभैरव या भागात एकूण १५ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
----------------
उसन्या पैशांवरून आशा स्वयंसेविकेस मारहाण, जबर जखमी
चांदवड : तालुक्यातील वाघदर्डी येथील आशा स्वयंसेविकेस तीन जणांनी मारहाण केल्याची फिर्याद चांदवड पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याबाबत सुरेखा ज्ञानेश्वर संसारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दीपाली पप्पू संसारे, दीपक दिनकर संसारे, राजुबाई दिनकर संसारे (सर्व रा. वाघदर्डी) यांनी दि. ३१ मे रोजी समाज मंदिर, वाघदर्डी येथे सुरेखा संसारे या दीपाली संसारे हिचेकडे तीन वर्षांपूर्वी दिलेले उसने पैसे मागण्यासाठी गेल्या असता त्याचा राग येऊन दीपाली संसारे, दीपक संसारे, राजुबाई संसारे यांनी हातातील काठीने मारून डोक्यावर, कपाळाजवळ व डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मोठी दुखापत केली. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरिश्चंद्र पालवी तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------
ग्रामपंचायत सदस्याने शौचालयाचा खोटा दाखला जोडल्याची तक्रार
चांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन बाळू पगारे यांनी निवडणूक अर्जासोबत शौचालय असल्याबाबत खोटा दाखला जोडला असून, ही बाब ग्रामपंचायतीच्या निर्देशनास आणून दिली आहे. दोन दिवसात शौचालय बांधले, असा तक्रारी अर्ज दहेगाव येथील कैलास लक्ष्मण कडनोर व काशाबाई शिंदे, रोहिणी बिडगर, सचिन अहिरे, ऋृषिकेश अहिरे, वाल्मिक अहिरे, ज्ञानेश्वर बिडगर, मच्छिंद्र शिंदे, अण्णा कडनोर, विजय कलवर, बळीराम कलवर, गौतम सोनवणे, शिवाजी बिडगर, अंबादास गायकवाड आदिंसह नागरिकांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी, निवडणूक अधिकारी यांच्याकडे केला आहे. त्यांची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी या अर्जात केली आहे.