नाशिक : महापालिकेच्या वतीने पुण्यातील खेडमधील रानमाळाच्या धर्तीवर नाशिक शहरात लोकसहभागातून वृक्षसंवर्धन करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने पावणेचार लाख रुपये खर्च करून निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर यासंदर्भात कार्यवाही होणार आहे. दरम्यान, यापूर्वी अशाप्रकारचा प्रयोग राबविताना त्यास नागरिकांचा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे यंदा कितपत प्रतिसाद मिळेल, याविषयी शंका आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवड केली जाते आणि त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चदेखील होतो. अनेकदा महापालिकेकडून झाडे घेऊनदेखील लावली जातात. तथापि, यंदा महापालिकेनेच खास लोकसहभागातून वृक्षलागवडीचा निर्णय घेतला आहे. खेड तालुक्यात असा प्रयोग राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून वृक्षसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. स्थानिक नागरिक सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या आप्तेष्ठांच्या स्मृतिनिमित्त किंवा अन्य कारणावरून वृक्षसंवर्धन केल्यास वृक्षसंवर्धनास मदतच होणार आहे.खासगी संस्थांच्या प्रतिसादाची उत्कंठामहापालिकेच्या वतीने यापूर्वी एकदा वृक्षलागवडीसाठी लोकसहभागातून अशाप्रकारच्या वृक्षरोपणासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. विशेषत: पर्यावरणप्रेमी संस्था तसेच ज्येष्ठ नागरिक संघ यांना आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रतिसाद मिळाला नव्हता. अर्थात, महापालिकेने अटी-शर्तीं घातल्या होत्या. त्यामुळे प्रतिसादच मिळाला नाही हे एक कारण असले तरी झाडे लावल्यानंतर ती टिकावी यासाठी प्रशासनाने या अटी घातल्याचेदेखील सांगण्यात येते. या घटनेला अनेक वर्षे झाली असून, आता तरी खासगी संस्था आणि व्यक्ती कसा प्रतिसाद देतात त्याविषयी उत्कंठा आहे.
वृक्ष खरेदीसाठी चार लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:02 AM