नाशिक : गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. गेल्या चार महिन्यांत स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडरही तब्बल सव्वादोनशे रुपयांनी महागला असून स्वयंपाकाचा गॅस प्रति सिलिंडर ८३२ रुपये झाला आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढविल्याने सामान्य कुटुंबीयांवर इंधनासाठी पुन्हा लाकडाचा पर्याय शोधावा लागत आहे. तर शहरालगतच्या ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्याचे दिसून येत आहे. पेट्राेल-डिझेल सातत्याने महागत असून पेट्राेल शंभर रुपये लीटरच्या जवळ पाेहाेचले असून डिझेल ८७.७३ रुपयांपर्यंत महागले आहे. तर स्पीड पेट्रोलने शंभर रुपये प्रति लीटरचा टप्पाही ओलाडला आहे. या इंधन दरवाढीचा परिणाम किराणा मालावरही होत असून स्वयंपाकघरातील डाळी, खाद्यतेल, मसाले, मिरची यासह गहू, तांदूळ आदी धान्य किराणा मालाचे भावही भडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महागाईविरोधात संताप व्यक्त होत आहे.
इन्फो
सरकारने स्वच्छ इंधनासाठी उज्ज्वला याेजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना माेफत गॅस सिलिंडरचे वितरण केले. मात्र ज्यांना सिलिंडर दिले त्यांना आता या महागलेल्या सिलिंडरच्या किमती परवडत नाहीत. त्यामुळे घरात गॅस सिलिंडर असूनही महिलांना चुलीचा धूर सहन करण्याची वेळ आली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या सिंलिडरसोबतच व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वेगाने वाढ हाेत असून १९ किलाे वजनाच्या या सिलिंडरचे दर ९८ रुपयांनी वाढून तब्बल १६१२.५० रुपयांवर पाेहाेचले आहे. महिनाभरातच हे दर साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढले असल्याने व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न हाॅटेल व्यावसायिकांना पडला आहे.
अशी आहे इंधन दरवाढ
महिना - पेट्रोल - डिझेल - गॅस
१ नोव्हेंबर- ८८.२१- ७६.१६ - ५९८
१ डिसेंबर - ८९.४४ - ७८.२० - ६४८
१ जानेवारी - ९०.७६ - ७९.७१ - ६९८
१ फेब्रुवारी - ९३.२८ - ८२.४५ - ७२३
१ मार्च - ९७.९२ - ८७.५९ - ८३२