देवळा : तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ कांदा व्यापा-यांनी ८३५ शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे ३ कोटी २१ लाख २७ हजार ८६६ रूपयांचे दिलेले धनादेश खात्यावर शिल्लक नसल्यामुळे वटत नसल्याबद्दल देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी चार व्यापा-यांना अटक करण्यात येऊन त्यांची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरीत आठ व्यापा-यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ कांदा व्यापा-यांनी नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात ८३५ शेतक-यांकडून 3 कोटी २१ लाख २७ हजार ८६६ रूपये किंमतीचा कांदा खरेदी केला व संबंधित शेतक-यांना मालाच्या किंमतीचे धनादेश दिले होते. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनिमय ) अधिनियम १९६३ व १९६७ खालील नियम २० ( १) ‘अ’अन्वये शेतीमाल विक्रि ची रक्कम शेतक-यांना २४ तासांच्या आत देणे बंधनकारक असतांना व्यापा-यांनी त्यांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसतांना त्या खात्याचे धनादेश शेतक-यांना दिले व विश्वासघात करून त्यांची फसवणूक केली. उमराणा बाजार समितीचे सचिव नितिन जाधव यांनी संबंधित व्यापा-यांनी शेतक-यांकडून खरेदी केलेल्या मालाची रक्कम त्यांना अदा करावी असे लेखी व तोंडी कळवूनही व्यापा-यांनी रक्कम अदा केली नाही. त्यामुळे सचिव नितिन जाधव यांनी ३१ जुलै २०१८ रोजी तशा आशयाची देवळा पोलिसात फिर्याद दिल्यानंतर १२ कांदा व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरु द्ध सदर व्यापा-यांनी सत्र न्यायालयातून दोन टप्यात पैसे भरण्याचे प्रतिज्ञापत्र करून अटकपूर्व जामीन मिळवला होता. यानंतरही शेतक-यांचे पैसे न दिल्याने देवळा पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी कारवाई करून उमराणे परिसरातील दादाजी बुधा देवरे (५२), विक्र म त्र्यंबक देवरे (४७), महेंद्र खंडेराव देवरे (४२) आणि प्रकाश मोहनलाल बाफना (५५) या चार व्यापा-यांना अटक करून कळवण न्यायालयात हजर केले असता २६ तारखेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चारही व्यापा-यांची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
चार कांदा व्यापा-यांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 5:28 PM
शेतक-यांची फसवणूक : सुमारे तीन कोटींचे धनादेश न वटल्याने कारवाई
ठळक मुद्दे८३५ शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे ३ कोटी २१ लाख २७ हजार ८६६ रूपयांचे दिलेले धनादेश खात्यावर शिल्लक नसल्यामुळे वटत नसल्याबद्दल देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल