वाडीवऱ्हे : नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. बुधवारी (दि.१५) रात्री सव्वाआठ वाजता वाडीवऱ्हे फाट्यानजीक शेवाळे नाल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात इगतपुरी शहरातील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान बालके आहेत.
अपघातानंतर मनसेचे आत्माराम मते हे मागून येत असल्याने त्यांनी त्वरित जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना कळविले. रुग्णवाहिकेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. एमएच १५ एच के ८३८१ या क्रमांकाच्या दुचाकीने नाशिकहून इगतपुरीच्या दिशेने संतोष साहेबराव पवार (३५) हे पत्नी आरती पवार (२७), मुलगा संतोष (६), मुलगी शिवानी (४) (सर्व रा. तीन लकडी, इगतपुरी) हे जात होते. रात्री सव्वाआठच्या सुमाराला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने अपघात झाला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास चालू आहे.