नव्या चलनातील नोटांशी साम्य असलेल्या बनावट नोटा हुबेहूब तयार करुन गुजरातच्या धरमपूर तालुक्यात चलनात आणण्याचा डाव वलसाड पोलिसांनी उधळून लावला. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती गावे गुही, मांदा, मोरचोंड येथून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. यामधील संशयित हरिदास चौधरी यास यापूर्वी सुरगाणा पोलिसांनी मद्य तस्करीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या होत्या. या सराईत चौधरीविरुध्द सुरगाण्यासह सापुतारा पोलीस ठाण्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार संशयित जयसिंग वळवी, भगवंत डंबाळे, अनिल बोचल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा म्होरक्या अनिल हा पदवीधर असून त्याने इतरांच्या मदतीने त्याच्या टेंभरुणपाडा येथील राहत्या घरी बनावट नोटा तयार केल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. उंबरठाण येथे त्याने सेतू कार्यालय चालविण्यास घेतले असून कार्यालयातील संगणक, प्रिंटरच्या मदतीने त्याने हा ‘उद्योग’ सुरु केल्याचे वलसाड पोलिसांनी सांगितले.
--इन्फो--
आठवडे बाजार, अवैध अड्ड्यांवर बनावट नोटांची चलती
सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर चालणारे अवैध जुगार, मद्यविक्रीच्या अड्ड्यांवर तसेच गाव, पाड्यांवर भरणाऱ्या आठवडे बाजारांमध्ये मोठ्या चलाखीने बनावट नोटा चलनात टोळीकडून आणल्या जात होत्या. बहुतांश लोकांनी सुध्दा या बनावट नोटांचा चलनासाठी वापर केल्याची उंबरठाण ते धरमपूरपर्यंत चर्चा आहे. टोळी गजाआड झाल्यानंतर अनेकांनी आपल्याजवळील बनावट नोटांची ‘होळी’ केल्याचेही बोलले जात आहे.
--इन्फो--
तीन लाखांची रोकड पुरली
मांदा येथील राहत्या घराच्या पाठीमागे हरिदास चौधरी या सराईत गुन्हेगाराने तीन लाखांच्या बनावट नोटा जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पुरलेल्या बनावट नोटा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात हा सगळा बनावट नोटांचा कारखाना उभा राहत असताना ग्रामीण सुरगाणा तालुका पोलिसांना मात्र त्याचा मागमूस लागला नाही. वलसाड पोलिसांनी ‘नेटवर्क’च्या माध्यमातून हे रॅकेट उघडकीस आणले.