शुक्रवारी सायंकाळी शेख सिकंदर शेख अन्वर यांच्या दुचाकीला रिक्षाचा धक्का लागला होता. त्यावरून सिकंदर रिक्षाचालकाला शिवीगाळ करीत असताना रिक्षातील महिला प्रवाशांनी जाऊ द्या, असे म्हणत प्रकरण मिटविण्यात सांगितले असता, सिकंदरने प्रवासी महिलांना शिवीगाळ केली. त्यावर समोरच उभ्या असलेल्या फिर्यादीचा मित्र सोहेल यांनी महिलांना शिवीगाळ करू नको म्हणून समजून घेण्यास गेला असता दोघांमध्ये भांडण झाले. काही वेळातच त्या भांडणाची कुरापत काढून शेख सिकंदर, त्याचे वडील शेख अन्वर व भाऊ मजहर यांनी संगनमत करून फिर्यादीच्या गल्लीत येऊन शिवीगाळ केली व दमदाटी करीत गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नव्हते. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इन्फो
संशयिताना तत्काळ अटक
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पोलीस ठाणे गाठून संशयिताना त्वरित अटक करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड पोलीस कर्मचारी मनोज भावसार, देवीदास पाटील, गोविंद बिराडे यांच्या पथकाने शोध घेत मुख्य संशयित शेख मजहर शेख अन्वर (२५), शेख सिकंदर शेख अन्वर (२०), शेख अन्वर शेख करीम (५०) रा.तडवीनगर व शेख नदीम शेख बशीर, रा.गुलशने खालीद यांना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ करीत आहेत.