लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ओलांडल्याने खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित ५ टक्के भाताच्या पेरण्या येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असला तरी, नाशिक व निफाड तालुक्यांत झालेला पाऊस व निर्माण झालेली पूरपरिस्थिती शेतकऱ्यांच्या मुळाशी उठण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय बागलाण, नांदगाव, मालेगाव, येवला या तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा असून, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास पिके धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली. त्यातही काही ठराविक तालुक्यांमध्ये एक-दोन पाऊस दमदार पडल्याने शेतकºयांनी त्या भरवशावर पेरणी केली. मात्र पावसाने त्यानंतर पाठ फिरविल्याने ७० टक्क्यांवरच पेरण्या अडकून पडल्या होत्या. जुलैच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने व ते आजवर कायम राहिल्याने जिल्ह्यातील साडेसहा लाख खरिपाच्या हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाखांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. उर्वरित पेरणी भाताची असून, सध्या पाऊस सुरू असल्याने तीदेखील पूर्ण होणार आहे. पावसाच्या सर्वदूर आगमनाने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त केला जात असला तरी, काही तालुक्यांना अजूनही पावसाची गरज आहे. पावसाअभावी पिकांची पाने पिवळसर पडू लागले आहेत. विशेष करून बागलाण, मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यांत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीखाली पुरेशी ओल तयार न झाल्याने पिकांच्या वाढीवरही त्याचा परिणाम जाणू लागला आहे. या तालुक्यातील पिकांना अजूनही पावसाची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले.नाशिक, निफाड, दिंडोरी या तालुक्यांत सरासरीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला असून, नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना धोका निर्माण झाला असून, विशेष करून सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग ही पिके खराब होण्याची शक्यता आहे.