प्रवीण दोशी वणीजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, शिवसेना, राष्ट्रवादी भाजपा, काँग्रेस, माकप अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्याने वणी गटाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव असलेल्या गट-गणांत पंचरंगी लढत होत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवार व वणीच्या सरपंच सुनीता भरसठ व शिवसेनेच्या उमेदवार वणी ग्रामपालिकेच्या सदस्य छाया गोतरणे यांच्यातील लढत प्रामुख्याने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सुनीता भरसठ यांचे पती मधुकर भरसठ व छाया गोतरणे यांचे पती राजेंद्र गोतरणे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. ग्रामपालिका आदिवासी सोसायटी व इतर संस्थांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषदेच्या वणी गटासाठी दोघींची प्रबळ दावेदारी होती. मात्र महिला आरक्षणामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांच्यात समेट घडविण्यासाठी अनेक मातब्बरांनी मध्यस्थी केली. पण सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पार्टीने भारती गवळी यांना रणांगणात उतरविले आहे. युती तुटल्याने भाजपाला हा गड एकट्याने लढवावा लागणार आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गवळी यांना परिश्रमाची कसोटी पार पाडावी लागणार आहे. गवळी यांना राजकीय पार्श्वभूमी नसली तरी विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग व भाषणबाजी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
वणी गटात चौरंगी लढत
By admin | Published: February 16, 2017 12:19 AM