नाशिक : चालू आर्थिक वर्षात ९७ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, पुढच्या आर्थिक वर्षासाठी पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ करण्याचे, तसेच सुमारे चार हजार कोटी रुपये इतके पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बॅँकर्स समितीची बैठक राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी विविध पीककर्ज वाटप तसेच बॅँकांना दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेतला. तिसऱ्या तिमाहीतील पीककर्ज वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, त्यासाठी कृषिपूरक व्यवसायांसाठी कर्जवाटपाकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. डीजीधन मेळाव्यासाठी बॅँकांनी पूर्वनियोजन करून अधिकाधिक व्यक्ती मेळाव्याचा लाभ घेतील, याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. सिन्नर तालुक्यातील दापूर येथील बॅँक आॅफ महाराष्ट्रने गाव कॅशलेस करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, बॅँक आॅफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक आर. एम. पाटील, रिझर्व्ह बॅँकेचे सी. कार्तिक, लिड बॅँक मॅनेजर अशोक चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पीककर्जासाठी चार हजार कोटींचे उद्दिष्ट
By admin | Published: February 23, 2017 12:32 AM