राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नुकतेच ड्राय रन केेले होते. लसीकरणासाठी शहरातील कॅम्पातील शहरी आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र निमा १, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव अशा चार केंद्रांची निवड करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेसाठी १४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांंत प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रथम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर, स्वच्छता कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांना लसीकरण केले जाणार आहे. फ्रंट लाइनवरील दोन हजार ६०० लाभार्थ्यांची लसीकरणासाठी नोंद करण्यात आली आहे. दोन टप्प्यांत हे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी किमान १२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. एका व्हायलमध्ये १० लाभार्थी होतील, एवढ्या डोसची मात्रा असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९६, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २६० व्हायलची गरज लागणार आहे. शासनाने लसीकरण केंद्रांना मंजुरी दिल्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावकरांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत कोविड प्रतिबंधक व्हायलचा साठा ठेवला जाणार आहे. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमान व डी फ्रीजमध्ये उणे २० अंश तापमानामध्ये ही लस ठेवली जाणार आहे. गरजेनुसार व्हॅक्सिन व्हॅनद्वारे लस पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली.
मालेगावी चार कोविशिल्ड लसीकरण केंद्रांसह चार हजार डोस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:13 AM