नाशिक : लहान मुलगी रडत असल्याने आईने खाऊसाठी दिलेले दहा रुपयांचे नाणे मुलीने नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़ ५) नाशिकरोडजवळील चांदगिरी येथे घडली़ शालिनी दत्तात्रय हांडगे (वय ४, रा. चांदगिरी, ता. जि. नाशिक) असे नाणे गिळल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे़ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सिडको परिसरात फुगा गिळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ त्यानंतर दहा रुपयांच्या नाण्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदगिरी येथे दत्तात्रय हांडगे हे पत्नी, मुलगा व मुलगी शालिनीसह राहतात़ रविवारी (दि़४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शालिनी रडत असल्याने वडील दत्तात्रय यांनी आपण खाऊ घ्यायला जाऊ, असे सांगितले़ तसेच खाऊ घेऊन देणार, असा विश्वास यावा यासाठी तिच्या आईने दहा रुपयांचे नाणेही तिच्याकडे दिले़ यानंतर घरकामात व्यस्त असताना अचानक शालिनीने दहा रुपयांचे नाणे तोंडात टाकले व ते तिच्या घशात अडकले़ यानंतर हांडगे कुटुंबीयांनी तत्काळ तिला महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी नेले असता आमच्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर नाही, तुम्ही दुसरीकडे हलवा, असे सांगण्यात आले़हांडगे कुटुंबीयांनी तत्काळ शालिनीला आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संशोधन केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते़ मात्र उपचारादरम्यान सोमवारी (दि़५) सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉ़ प्रज्ञा शेलूकर यांनी घोषित केले़ यानंतर शालिनीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला़ या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर दहा रुपयांचे नाणे हे तिच्या घशामध्ये अडकल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले़ दत्तात्रय हांडगे हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून, शालिनी ही त्यांची एकुलती एक मुलगी होती़ दरम्यान, या घटनेची नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़