चांदवड : शहरातील वरचेगाव, शिंपी गल्ली व प्रभाग क्रमांक १०मध्ये डेंग्यूच्या आजाराचा प्रसार झाला असून, या आजाराने वरच्या गावातील चारवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला, तर सुमारे सात जणांना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. संबंधितांनी त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश चंद्रकांत खैरनार व सुमारे ५० नागरिकांनी निवेदनाद्वारे नगर परिषद, प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री याकडे केली आहे.चांदवड शहरातील वरचेगाव, शिंपी गल्ली येथे प्रभाग क्रमांक १० मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, दि. २२ एप्रिल रोजी गौरव अरुण महाले यांची भाची तन्वी योगेश बोरसे (४ वर्षे) हिचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला, तर गेल्या आठ ते दहा महिन्यांपूर्वी वरच्या गावातीलच अमोल बिल्लाडे यांच्या मुलीचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता. आरोग्य विभाग, नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने याच गल्लीतील सार्थक किशोर बोरसे (७ वर्षे), प्रथमेश मनोज बोरसे (७), साई महेश व्यवहारे (८) , प्रसाद किशोर सोनवणे (१४) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. हे सर्व रुग्ण चांदवडच्या डॉ. प्रसाद कापडणी यांच्या रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत, तर महेश व्यवहारे, संकेत राऊत, प्रसाद सोनवणे व अन्य काही रुग्ण डेंग्यू आजाराने आजारी आहेत तर काही रुग्णांवर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले. या डेंग्यू आजाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संबंधितांनी त्वरित काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सुमारे ५० ते ६० नागरिकांच्या सह्या आहेत. याबाबत प्रस्तृत प्रतिनिधीने उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जायभावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या बाबीची कल्पना नव्हती. त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)
चांदवड येथे चारवर्षीय बालिकेचा डेंग्यूने मृत्यू
By admin | Published: May 10, 2016 10:02 PM