प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 01:50 IST
जुन्या वादाची कुरापत काढून एका युवकाला सुमारे सात वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरी व दीड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दशरथ रामभाऊ आमटे (४१) असे आरोपीचे नाव आहे.
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी
नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढून एका युवकाला सुमारे सात वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरी व दीड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दशरथ रामभाऊ आमटे (४१) असे आरोपीचे नाव आहे.पंचवटीतील हनुमानवाडी येथे २१ एप्रिल २०१४ रोजी आरोपीने संतोष भीमा धात्रक याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. भीमा नारायण धात्रक (रा. फुलेनगर) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी दशरथ व संशयित संगीता आमटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. भीमा हा आपल्या मुलासह एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना आरोपी दशरथ आमटे व संशयित संगीता आमटे यांनी कुरापत काढून संतोषला मारहाण केली. दशरथ याने त्याच्याजवळील चाकूने संतोषच्या पोटावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. ए. देशमुख यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. शिरीष कडवे यांनी युक्तिवाद केला. आरोपी दशरथ विरोधात परिस्थितीजन्य पुरावे आढळल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी त्यास चार वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. तसेच संशयित संगीता आमटे यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.