नाशिक : शहरातील विविध तेरा मैदानांवर राज्यस्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळविली जात असून यामध्ये तीन राज्यांमधील वकिलांच्या ८० संघांनी सहभाग घेतला आहे. रविवारी (दि.२६) स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एरवी युक्तिवाद करताना न्यायालयात चौकार-षटकार लगावणाऱ्या वकिलांनी आज क्रिकेटच्या मैदानावरही चेंडू सीमेपार फटकावला.
नाशिक बार असोसिएशन, रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ॲड. क्रिकेट ॲन्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये रविवारी संध्याकाळी पार पडले. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक, न्यायमूर्ती संदीप शिंदे, मकरंद कर्णिक उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे अध्यक्षस्थानी होते. न्यायाधीश दौलतराव घुमरे, न्यायाधीश दिलीप घुमरे, नाशिक बारचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, वेस्टर्न ॲड. असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष संजीव कदम, ॲड. का. का. घुगे उपस्थित होते.
यावेळी नाईक म्हणले, क्रिकेट खेळासारखेच न्यायिक क्षेत्रातसुद्धा फेेअर प्ले सांघिक स्पिरिटदेखील आल्यास न्यायदान प्रक्रियेला मोठी मदत होईल. ताणतणावपूर्ण जीवनातून आनंद मिळविण्यासाठी आणि आपले शारीरिक आरोग्य राखण्यासाठी वकिलांनासुद्धा खेळात रमणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सांगितले. क्रिकेट स्पर्धेमुळे विविध राज्यांमधील वकिलांमध्ये आपापसांत ओळख निर्माण होऊन नातेसंबंध वृद्धिंगत होण्यास मदत होते. त्यामुळे अशा स्पर्धा भविष्यात व्यापक स्वरुपात घेतल्या जाव्यात, असे न्यायमूर्ती शिंदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी ॲड. कमलाकर दिघे लिखित ‘दस स्पोक द ग्रेट जज’, या दिवंगत न्यायमूर्ती एम. सी. छगला यांचे ‘रोझेस इन डिसेंबर’ या आत्मचरित्रावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रकाश आहुजा, सचिव जालिंदर ताडगे, संजय गीते, शरद मोगल, ॲड. एस.यू. सय्यद, ॲड. धर्मेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. ॲड. विवेकानंद जगदाळे यांनी प्रास्ताविक केले.
--इन्फो--
तीन राज्यांचे वकील ‘आमने-सामने’
टी-२० किक्रेट स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांमधील वकिलांचे ८० संघ समोरासमोर येत आहेत. शहरातील तेरा मैदानांवर पुढील दोन दिवस ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून ८० संघांनी सहभाग घेतला आहे. येत्या २ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहेत. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्पर्धा पार पडत असल्याने वकीलवर्गात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.