नाशिक : वडाळा गावातील मदरशातील चौदा विद्यार्थ्यांना टायफाईड ताप झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉ. भंडारी यांनी सांगितले. मंगळवारी प्रभागाच्या नगरसेवकांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबरच औषधोपचाराची माहिती जाणून घेतली.वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश आलेले नसून, गावातील दारुल उलूम गौसिया या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून चौदा विद्यार्थ्यांसह धर्मगुरूंना पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गावातील सादिकनगर, मेहबूबनगरसह गावठाण परिसरात डासांच्या वाढत्या उच्छादाने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गावातील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे त्यातच दोन दिवसांपासून मदरशामधील १४ विद्यार्थी थंडी-तापाने फणफणल्यामुळे मंगळवारी सकाळी प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, अॅड. श्याम बडोदे व सचिन कुलकर्णी यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. भंडारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मदरशामध्ये असलेल्या स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या मदतनीसाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना टायफाईडची लागण झाल्याचे सांगितले. रुग्णांची प्रकृती बरी असून, येत्या एक-दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉ. भंडारी यांनी सांगितले.