मागील दोन वर्षांत पंचवटी पोलिसांत चार, तर आडगाव पोलिसांत तीन सोनेसाखळी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले हाते. या गुन्ह्यांचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून केला जात होता. संशयित धनंजय महेश गायकवाड (२१,रा. काजीपुरा, जुने नाशिक) याने एकट्याने व त्याच्या जोडीदारासह चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची गोपनीय माहिती हवालदार गंगाधर केदार यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना त्यांनी माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे सहायक निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने गायकवाडचा माग काढला. त्याचे ‘लोकेशन’ ट्रेस झाल्यानंतर पथकाने पुण्यात जाऊन सापळा रचून त्यास अटक केली तर दुसरा चोरटा ज्ञानेश्वर ऊर्फ अजय ऊर्फ बांड्या विजय गोसावी-गिरी (२१,रा. नांदुरगाव, साईनगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता २०१९ व २०२० मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल सोनसाखळी चोराीचे चार गुन्हे व आडगाव पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, दोन मोबाइलसह १४.५ तोळे सोने असा एकूण सुमारे ७ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या इतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे मध्यवर्ती गुन्हे शाखेने सांगितले.
चोरट्यांकडून चौदा तोळे सोने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:11 AM