नांदूरवैद्य : संपूर्ण देशासह राज्याला कोरोना विषाणूने ग्रासले असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराच्या रु ग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या भयावह आजाराने मोठमोठ्या महानगरांसह ग्रामीण भागातही आपले बस्तान मांडण्यास सुरु वात केली आहे. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी तालुक्यातील घोटी येथे १, बेलगाव १, इगतपुरी शहरात एक रुग्ण आढळून आला असताना रायांबे गावात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रु ग्ण मुंबई अंधेरीतील औद्योगिक वसाहतीत शासकीय विभागात कामाला होता. मुंबई येथे लॉकडाउन झाल्यामुळे हा इसम नाशिकमधील मुख्यालयी दररोज येऊन-जाऊन काम करायचा. दरम्यान त्याला ताप-सर्दीचा त्रास झाल्याने तो नाशिक सिडको येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता तो बाधित असल्याचे निष्पन्न झाले.त्याच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना इगतपुरी येथील एकलव्य इंग्रजी माध्यम शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. तर १८ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे, अशी माहिती इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. देशमुख यांनी दिली. दरम्यान रायांबे गावातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाने गावातील सर्व रस्ते सील केले आहेत. तसेच येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोविड -१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:07 PM