नाशिक : महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना गोपनीय असली तरी ती अगोदरच फुटली असल्याने ती जाहीर होण्याची केवळ औपचारीकताच ठरल्याचे मंगळवारी (दि.१) जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून स्पष्ट झाले. ‘लोकमत’ने वानगीदाखल काही प्रभागांची रचना प्रसिद्ध केली होती, तीच खरी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, प्रभाग रचनेच्या पहिल्याच दिवशी एक हरकत प्राप्त झाली आहे. नाशिक महापालिकेची प्रभाग रचना तयार होत असताना त्यावर राजकीय प्रभाव असल्याच्या चर्चा हेात होत्या. एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या घरात बसून प्रभाग रचना तयार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर केवळ एकच नव्हे तर सर्व पक्षीय राजकीय नेते आणि प्रस्थापित नगरसेवकांचा समावेश असल्याचे देखील चर्चेत होते. त्यानुसार ‘लोकमत’ने वृत्त देतानाच पंचवटीत माजी महापौर रंजना भानसी यांचा म्हसरूळ-आडगाव तसेच स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची आरटीओ ते बोरगड अशी तर विरोधी पक्ष नेते अजय बाेरस्ते यांच्या प्रभागातील संभाव्य प्रभाग रचनेत पंडित कॉलनी, अशोक स्तंभ, पोलीस मुख्यालय, सीबीएस, त्र्यंबक नाका, तरण तलाव तसेच स्थायी समितीच्या माजी सभापती यांच्यासाठी गंगापूर नाका ते आकाशवाणी केंद्रपर्यंत प्रभाग रचना असेल असे स्पष्ट केले होते. माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांचा महात्मानगर येथील प्रभाग सातपूर विभागातील कामगारनगरपर्यंत नेण्यात आला असल्याचे नमूद केले हेाते, हे सर्व खरे ठरले असून त्यामुळेच प्रभाग रचनेमुळे प्रस्थापितांना संधी तर इच्छुकांची कोंडी हेाणार असल्याचे स्पष्ट केले हेाते.
दरम्यान, महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होतानाच हरकती घेण्यास प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी पूर्व विभागीय कार्यालयात एक हरकत दाखल झाली आहे.
इन्फो...
मुकेश शहाणे यांच्या तक्रारीनंतर बदल?
सिडकोतील प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला हाेता, महासभेतील आरोपामुळे खळबळ उडाली होती त्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्या प्रभागातील जो भाग अन्य प्रभागाला जोडला जाणार होता. तो आता त्यांच्या मूळ प्रभागातच कायम ठेवल्याचे प्रभाग रचनेतून दिसत आहे.