नाशिक : सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित विकासक दीपक कचरू हांडगे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात द्वारकानाथ चुनीलाल लढ्ढा (७७, रा. विमल हाईट्स, आनंद लाँड्रीच्या मागे, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या पंडित कॉलनीतील सर्व्हे नंबर ६५९/५/४/१ येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटचा फ्लॅट नंबर २ हा त्यांची मुलगी उल्का आनंद राठी यांच्या नावावर आहे. संशयित दीपक हांडगे याने दि. २३ सप्टेंबर २०१३ ते दि. १० जून २०१८ या कालावधीत प्रथमेश अपार्टमेंट पुनर्विकसित करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर २३ सप्टेंबर २०१३ रोजी पुनर्विकसित करण्याची नोंद करून घेतली.
करारनाम्यात चोवीस महिन्यांत पुनर्विकसित केलेल्या फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरलेले असल्याने संशयिताने ९ जून २०१८ रोजी लढ्ढा यांना फ्लॅट नंबर ५०१ ची चावी दिली़ मात्र संशयिताकडे वारंवार मागणी करूनही ताबा पावती दिली नाही. त्यानंतर संशयित हांडगे याने सप्टेंबर २०१५ मध्ये विशाल जोशी व उमेश जोशी यांना फ्लॅटचे साठेखत करून देत लढ्ढा यांच्या मुलीची फसवणूक केली.