दिंडोरी : तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना एका निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रकमेस फसविले असून या प्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्री सोल्युशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) या व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. यातील अमित देशमुख फरार आहे. इतरांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयित व्यापाऱ्यांनी सुनील शिंदे, निगडोळ येथील अनिल मालसाने, नळवाडी येथील संजय वाघ, शरद मालसाने, वलखेड येथील रघुनाथ पाटील या शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. संशयितांनी पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी अद्याप पैसे परत केले नाही. दरम्यान इतर अनेक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण करत आहेत.
दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 01:34 IST