नामदेव भोर /नाशिक
नाशिक : हज यात्रेसाठी दिलेल्या रक्कमेपैकी १ लाख दहा हजार रुपयांची रक्कम परत मागणाऱ्या हज यात्रेकरूला रक्कम परत न देता जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई नाका पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२१) दाखल गुन्ह्यातून समोर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात फिरोज बशिर सय्यद (३६, रा. झिनत नगर, राणाप्रताप चौक, सिडको) यांनी संशयित नाविद सादिकमिया जाहागिरदार, सर्फराज इकबाल काझी , मोहम्मद जब्बार शेख व रफिक जब्बार शेख यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
फिरोज बशीर सय्यद यांनी संशयितांना हज यात्रेसाठी दिलेल्या रक्कमेपैकी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम परत मागितली. मात्र संशयितांनी खात्यात रक्कम शिल्लक नसताना १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश देत फसवणूक केली. त्यामुळे सय्यद यांनी संशयितांकडे रक्कमेची मागणी केली असता संशयितांपैकी रफिक जब्बार शेख याने सय्यद यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सय्यद यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चारही संसयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक मन्सुरी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.